इचलकरंजीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : मा. अशोकास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार डॉ. राहुल आवाडे व आमदार अशोक माने यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण — समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचा गौरव

कै. प्रकाश शंकर मगदुम स्मरणार्थ व खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, शाखा-इचलकरंजी तसेच एस.टी. फाऊंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्र इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अशोक स्वामी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, मुंबई) होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे समाज आणि देश प्रगतिपथावर वाटचाल करतो. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी जोपासावी. आज सन्मानित होणारे शिक्षक व विद्यार्थी हे आपल्या कार्यातून समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. इचलकरंजीसारख्या शैक्षणिक व औद्योगिक शहरात असा उपक्रम होणे अभिमानास्पद असून, शिक्षण व संस्कार यांची सांगड घालणाऱ्या शिक्षकांचा सन्मान ही खरी राष्ट्रसेवा आहे.”

कार्यक्रमाला आमदार डॉ. राहुल आवाडे, हातकणंगलेचे आमदार दलितमित्र अशोक माने, तसेच मा.श्री. बी.एम. कसार (शिक्षणाधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका), मा.श्री. भरत रसाळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समिती) हे मान्यवर उपस्थित होते.आमदार डॉ.आवाडे यांचे मनोगत म्हणाले, “शिक्षक समाजाचा कणा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थी घडतो आणि राष्ट्राचा पाया मजबूत होतो. आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा सन्मान म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमांना मिळालेली खरी दाद आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून समाजातील परिवर्तनासाठी हवे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि तरुण पिढीला प्रोत्साहन मिळते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व मूल्यांचा संस्कार करावा हीच खरी गुरुदक्षिणा ठरेल.”

या सोहळ्यात शहरातील गुणवंत विद्यार्थी तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.पुरस्कारप्राप्तांमध्ये मुख्याध्यापिका मा.सौ. निर्मला विजय चौगुले (किशोर ओलंपियाड), मा.कु. सुगंदा बापू चौगुले (समर्थ विद्या मंदिर), मुख्याध्यापक मा.श्री. किरणकुमार कोळी (विशाल विद्यालय), मुख्याध्यापिका मा.सौ. सुचिता सुनिल अलमान (खंजीरे प्राथमिक विद्यालय), शिक्षक मा.श्री. बाळासाहेब आनंदराव पवार (नाकोडा हिंदी शाळा) व मा.श्री. आनंद शांताराम कांबळे (ना.बा. विद्या मंदिर) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत गुरव यांनी केले, स्वागत श्री. सचिन वारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. शितल खानाज यांनी केले.या भव्य सोहळ्याला शहरातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन करत हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *