वस्त्रनगरी वृत्तसेवा
रुई : रुई मंडलातील सात गावांकरीता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत दोन ट्रॅक्टर तसेच विविध दाखल्यांचे वितरण आमदार अशोक माने यांच्या हस्ते आणि अपर तहसीलदार महेश खिलारी यांच्या अध्यक्षस्थानी करण्यात आले.अपर तहसीलदार इचलकरंजी मार्फत शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात.

रुई मंडलांतर्गत येत असलेल्या गावांकरीता महाराजस्व शिबिर घेण्यात आले. यामध्ये महसूल खात्यामार्फत २२ फेरफार नोंदींचे निर्मूलन करण्यात आले. सात/बाराचे ११ अर्ज स्वीकारले. १७८ खातेदारांना सात/बारा व ८ ‘अ’ चे दाखले वितरीत करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत २१ लोकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच १३ शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात आला. पोस्ट खात्यामार्फत २८ लोकांना लाभ देण्याबरोबरच १२८ लोकांना प्रतिज्ञापत्र, उत्पन्न दाखले, आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ५२ नागरिकांचे आधारविषयक कामकाजही पार पडले.
योजनेचा लाभ घ्या : शासनाच्या महसूल विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी केले.
हा कार्यक्रम आमदार माने, जि.प.सदस्य राहुल आवळे, महेश पाटील, पं.स.सदस्य अश्विनी बिरंजे, अश्विनी पोवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी रुई मंडल अधिकारी जानकी मिराशी, ग्राम महसूल अधिकारी पूजा सावंत, गजानन माळी, प्रधान भानसे, रवीशंकर राजगीरवाड,सरपंच आदी उपस्थित होते.

