गणेशोत्सवामध्ये ४ लाख भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; व्हाट्सअप ग्रुपचा मिळाला आधार

वस्त्रनगरी वृत्तसेवा/ विक्रम खांडेकर

इचलकरंजी : गणेशोत्सवामध्ये इचलकरंजीतील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. इचलकरंजी शहर आणि परिसरातील सुमारे ४ लाख भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या भक्ती भावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत बाजारपेठेत रेलचेल असते. बाप्पाचा उत्सव भव्य दिव्यप्रमाण करण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस वाटत असतात. अनेक मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.आपल्या गणेशोत्सव मंडळातील महाप्रसाद उत्तम असावा यासाठी प्रयत्न केले जातात. भात,शिरा,वांग्याची भाजी,आमटी आदी पदार्थ चांगल्या पद्धतीने करून महाप्रसाद घातला जातो. महाप्रसादासाठी नागरिकांना निमंत्रण दिले जाते.यावर्षी प्रथमच गणेशोत्सव मंडळातील महाप्रसादाची माहिती गणेश भक्तांच्या पर्यंत पोहोचावी यासाठी आधुनिकतेची कास धरत असताना व्हाट्सअप ग्रुपचा आधार घेण्यात आला.काही युवक एकत्र येऊन एक व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला.

“महाप्रसाद प्रेमी इचलकरंजी परिसर” या नावाने काढलेल्या या ग्रुप मध्ये ६५५ सदस्य जोडले गेले.११ दिवसामध्ये अनेक मंडळांनी महाप्रसादाचे निमंत्रण या ग्रुप मधील गणेश भक्तांना दिली. प्रत्येक दिवशी कोठे महाप्रसाद आहे ? किती वाजता आहे ? आणि ठिकाण आहे ? याची माहिती महाप्रसाद घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांना मिळाली. त्यामुळे त्यांना तिथे पोहोचणे शक्य झाले.प्रथमच निघालेल्या या ग्रुपचा मोठा फायदा झाला.विविध मंडळानी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सुमारे ४ लाख गणेश भक्तांनी लाभ घेतला. गणेशोत्सवा दरम्यान बाहेर गावाहून उत्सव पाहण्यासाठी आलेल्या लोकांनीही महाप्रसादचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *