छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा : महेश खिलारी

वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर

इचलकरंजी : इचलकरंजी महसूल विभागा मार्फत आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राजीव गांधी कार्यालयात संपन्न झाले. विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरामध्ये ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी इचलकरंजी, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, एस.टी. महामंडळ, महावितरण, नगर भूमापन विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये संजय गांधी श्रावणबाळ सेवा योजनेंतर्गत २४ लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला. पुरवठा विभागामार्फत ५० नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. तर नाव कमी-जास्त व दुरुस्ती संदर्भातील १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. सोबत एस.टी. महामंडळामार्फत ६ नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तर महावितरण विभागाने २५ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. नगर भूमापन विभागामार्फत १०८ प्रॉपर्टी कार्डांचे वाटप तर ४ फेरफार नोटिसा देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने १० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला.

महसूल विभागाच्या वतीनेही २४४ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती संदर्भातील ९ अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच ४२० सातबारा उतारे, ८-अ उतारे २८८ आणि १५५ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी विविध विभागांच्या समन्वयातून करण्यात आली. या कार्यक्रमास नायब तहसीलदार प्रांत कार्यालय संजय काटकर, तलाठी सुनिल भातामारे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक राजू बोंद्रे, व नितेश पोवार, आदिसह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *