इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात

वस्तूनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : टाळ -मृदुंगाचा निनाद, विठु माऊलीचा अखंड जयघोष, झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन् महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांचा ७५० वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्याचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि विविध वारकरी सांप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. ‘गोकुळ अष्टमी’ रोजीच श्री ज्ञानदेवांची ७५० वी जयंती आल्याने शासन निर्देशानुसार १५ ऑगष्ट रोजी पालखी सोहळा साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून कळिवणेत आले होते. या अनुषंगाने हा अभुतपूर्व पालखी सोहळा पार पडला.श्री शिवतीर्थ येथुन पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या पालखी सोहळ्यात विविधरंगी साड्या आणि गळ्यात टाळ परिधान केलेल्या महिला, अभंगात न्हाऊन गेलेले वारकरी आणि टाळाच्या निनादात ठेका धरलेले लोकप्रतिनिधी यामुळे मुख्य मार्ग हा ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात चिंब झाला होता. मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळा, श्रीमंत ना.बा. घोरपडे चौक ते वेदभवन याठिकाणी आल्यानंतर पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या दरम्यान, महिलांसह पुरुषांनीही झिम्मा फुगडी खेळत सोहळ्यात रंग भरला. सोहळ्याच्या समाप्तीनंतर सहभागी सात हजार महिलांसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, श्रीरंग खवरे, श्रीकांत टेके, राजु बोंद्रे, मनोज हिंगमिरे, अनिल डाळ्या, शशिकांत मोहिते, राजु बचाटे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्देकर, लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे, शिक्षण अधिकारी बी.एम. कासार, सौरभ साळुंखे, सुनिल बेलेकर, अनिस पठाण तसेच शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधींसह शहरातील वारकरी संप्रदायातील राजन उरुणकर, शिवाजी जगताप, विणेकरी तसेच नागरीकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *