वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : नदीवेस नाका परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित आरोग्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.
या सेवा केंद्रात अध्यात्मिक सेवांसोबतच समाजातील विविध घटकांच्या समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याची परंपरा केंद्राने कायम ठेवली आहे. या सामाजिक जाणिवेतूनच रक्तदानासारखा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला.
रविवारी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या शिबिरात परिसरातील नागरिक, युवक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपले थोडेसे रक्त एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन देऊ शकते, या भावनेतून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक व मानवतावादी कार्याच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
