वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलकडून विजयी झालेले प्रसिद्धीप्रमुख गणेश गारगोटे यांचा समता संघर्ष विचार मंचतर्फे विशेष सत्कार स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासाचा संकल्प अधोरेखित झाला.
समता संघर्ष विचार मंचाच्या वतीने माटुंग्यात दि.६ जून रोजी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास गणेश गारगोटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. निवडणुक आणि प्रसिद्धीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशस्वी होण्यासाठी सातत्य, कठोर परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यात समता संघर्ष विचार मंचाचे अध्यक्ष गणेश सवणे यांनी गणेश गारगोटे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना गणेश गारगोटे यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडे असून मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या हितासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे आणि महामंडळाचा कारभार अधिक पारदर्शक, कार्यक्षम व डिजिटल करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवोदित कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी चित्रपट उद्योग अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका समर्थ पॅनेलची राहील, असे गारगोटे यांनी सांगितले.
तसेच समता संघर्ष विचार मंच करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, या उपक्रमांमध्ये माझाही सक्रिय सहभाग असावा आणि समाजहिताच्या कार्यात शक्य ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही गारगोटे यांनी नमूद केले.
या सोहळ्यास समता संघर्ष विचार मंचाचे पदाधिकारी, मा.पोलीस अधिकारी दिलीप कांबळे, ज्येष्ठ सिने छायाचित्रकार बाबा लोंढे, सुरेश सावंत, पत्रकार परेश मोटे आदी उपस्थित होते.
