वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
कबनूर : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील तेजस्वी अध्याय असून, त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून आजच्या तरुण पिढीने चारित्र्यवान व कर्तृत्ववान बनावे, याच उद्देशाने कबनूर येथे त्यांच्या भव्य पुतळ्याचे निर्माण करण्यात येणार आहे.या पुतळ्यासाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र छत्रपतींचे थेट वंशज आणि खासदार श्री. उदयनराजे भोसले यांच्याकडून मिळाले असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.कबनूरमधील पुतळा समितीचे शिष्टमंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सातारा येथील जलमंदिर राजवाडा येथे उदयनराजे यांची भेट घेऊन पुतळा उभारणीसाठी अनुमती मागितली. खासदार उदयनराजेंनी या कार्यास आपला पाठिंबा दर्शवत शिष्टमंडळाला अधिकृत ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केले.या प्रसंगी शिष्टमंडळात विनायक गुंडकल्ले, कपिल सुतार, दत्तात्रय पाटील, सुनील इंगवले, शकील मुल्ला, रवींद्र धनगर, भिकाजी चौगुले, प्रशांत भिंऊगडे, आनंद कुलकर्णी, अभिजित सुतार आदींचा समावेश होता.या सकारात्मक निर्णयाबद्दल खासदार उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला.हा पुतळा केवळ ऐतिहासिक महत्त्वाचा न ठरता, भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे, असा विश्वास पुतळा समितीने व्यक्त केला.
