वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : प्रतिवर्षी प्रमाणे पर्यावरणपूरक आणि आनंदी वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहापूर खण येथे यंत्रणा सुसज्ज ठेवणेत आलेली आहे. शहापूर खण येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तीं विसर्जनाची व्यवस्था शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ , ओपन जीम जवळ आणि बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर अशा तीन ठिकाणी अद्ययावत क्रेनच्या सुविधेसह विसर्जनाची व्यवस्था करणेत आलेली आहे.
अनंत चतुर्दशी रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाकडील जवळपास २०० अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या सह आधार रेस्क्यू फोर्स, पोलिस बॉईज इचलकरंजी, वीर रेस्क्यु फोर्स इचलकरंजी, पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक तसेच २ यांत्रिक बोटी, ४ क्रेन, १ अग्निशमन वाहन, ४ रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह (इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, एन.यु. एच.एम., सेवाभारती रुग्णालय, क.बा. आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट) यांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम यांचे नियंत्रण राहणार आहे.तरी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शहापूर खण येथे करावे असे आवाहनआयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या कडुन करणेत येत आहे.
