महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रकाशझोतात राहिल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना सुद्धा त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेली ही लाडकी बहीण योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पाडण्यात आला आहे.
निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गणेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. ‘लाडकी बहीण’ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.
