वस्त्रनगरी विशेष वृत्त
मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले. या सभेतच उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी” असे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी भावना प्रत्येक मराठी माणसाची होती मात्र त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते मराठीच्या मुद्द्यावर तो योग जुळून आला आणि दोघे बंधू एकत्र आले.

महाराष्ट्रातील राजकारण बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाय पूर्णत्वास जात नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. मराठीची अस्मिता, मराठी माणूस याच्या अवतीभोवतीस शिवसेना आणि त्याचे राजकारण राहिले आहे. मात्र मराठीच्या मुद्द्याला त्यांनी कधी बगल दिली नाही. कोणताही आड पडदा ना ठेवता रोखठोक बोलण्याची ठाकरे कुटुंबीयाची पद्धत ही मराठी माणसाला नेहमीच आपलीशी वाटत आली आहे.

तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांचे एकत्र येण्याला “देर से आये लेकिन दुरुस्त आये” असेच म्हणावे लागेल. मराठीच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकारची तारांबळ उडाली. आणि त्यांनी तातडीने हिंदीची सक्ती मागे घेतले. राज्य सरकार झोपल्याचे लक्षात आल्यानंतर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने विजयी मेळावा घेण्याचे निश्चित केले. आणि त्या माध्यमातून दोघेही बंधू एकत्र आले. त्यांना एकत्र येण्यास खूप वर्षे लागली. माध्यमांमध्ये अनेक वेळा राज आणि उद्धव एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या मात्र त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. दरम्यानच्या मुद्दे उबाठा शिवसेना आणि मनसे मधील अनेक नेते पक्ष सोडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर काहींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. दुसऱ्या फळीतील अनेक नेते गेल्यामुळे कार्यकर्त्यांची चलविचल होत होती. अनेक कार्यकर्त्यांना दोघे नेते एकत्र यावेत असे वाटत होते. मात्र त्याला खूप वेळ घालवावा लागला. आता दोघे नेते एकत्र आले आहेत. मात्र कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत अशा परिस्थितीत मनसे आणि उबाठा कडील कार्यकर्ते महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी लागल्या आहेत. दोघांनीही एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढविल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना जरी होणार असला तरी कार्यकर्त्यांना मात्र विश्वासात घेऊन जागा निश्चित करण्याची गरज आहे. मुंबई बरोबरच राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे आपला करिष्मा दाखवू शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची आणि त्यांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता आहे. तरच दोन्ही एकत्र आल्याचा फायदा होईल.

