बदलापूर शहरातील वाढत चाललेला वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. कारण बदलापुरात 2 नव्या उड्डाणपूलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प होणार आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत, यासाठी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इतरही अनेक प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
बदलापूर शहरातील कात्रप परिसरात तसंच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे 2 नवे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून बेलवलीतील दत्त चौक ते बॅरेज रोडवरील समर्थ चौकापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारला जाणार असून त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय.
तर बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेचं पुनर्सर्वेक्षण करून रेड लाईन आणि ब्लू लाईनचा प्रश्नही निकाली काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. यासोबतच बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम, बदलापूर ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस ठाण्यांची पुनर्बांधणी, क्रीडा संकुलाचा विकास अशा एकूण 17 प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहितीही आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
