वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : अमली पदार्थ सेवनाची पाळेमुळे शोधून काढा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे महाविकास आघाडीने केली आहे.तसेच निदर्शने केली.निवेदनात,गेल्या काही महिन्यांमध्ये कोल्हापूर, सांगली सह पश्चिम महाराष्ट्रात कोकण चरस, गांजा, मेफेडॉन इत्यादी अमली पदार्थाची विक्री व सेवन प्रचंड प्रमाणावर वाढलेले आहे. याचे लोन आता इचलकरंजी शहरांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. वरील सर्व अमली पदार्थाची खुलेआम होणारी विक्री ही शहर व परिसरातील तरुणाईच्या मुळावर उठलेली आहे. वय वर्षे 15 ते 22 मधील तरुणांवर याचा गंभीर परिणाम होत आहे. या व्यसनांना बळी पडल्यामुळे शहरातील एकूणच गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे शहरातील अमली पदार्थाची विक्री व सेवन हा सर्व पालकांच्या चिंतेचा विषय झालेला आहे. इचलकरंजी हे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचे प्रमुख शहर असून या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्येच परप्रांतीय कामगारांची संख्या ही मोठी आहे. नुकतेच कोरोची मधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर ला ताब्यात घेऊन शहापूर पोलिसांनी त्यांच्या कडून लाखो रुपयाचे ड्रग जप्त केले आहे. हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक व शहराचे एकूणच स्वास्थ्य बिघडवणारा आहे.

त्यामुळे इचलकरंजी शहर व परिसरामध्ये अमली पदार्थाचे विक्रीचे पसरलेले जाळे मुळासकट मोडीत काढणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे सेवन करणे करिता महानगरपालिकेच्या पडीक इमारती, खुल्या जागा तसेच अंधाराचे साम्राज्य पसरलेला भाग उपयोगात आणला जातो. या ठिकाणी महानगरपालिकेने काही निर्णायक पावले उचलणे आवश्यक आहे.इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीची आपणास विनंती आहे की आपण याबाबत पुढाकार घेऊन शहरातील गावभाग पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन व शहापूर पोलीस स्टेशन तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या सक्षम अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर निर्णय घेण्यात यावा.सबब आपणास विनंती आहे की अमली पदार्थांची राजरोस होणारी विक्री, अमली पदार्थांचे तरुणाई तुन वाढलेले सेवन व त्यामुळे शहरातील वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण याबाबत आपण संयुक्त बैठक घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी.असे म्हटले आहे. यावेळी शशांक बावचकर,सयाजी चव्हाण,सदा मलाबादे, उदयसिंग पाटील,प्रमोद खुडे आदी उपस्थित होते.
