वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : मुलींनी आई-वडिल आणि शिक्षकावर विश्वास ठेवावा, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता असा सल्ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.येथील गणेशनगर अशोका सायझिंगमध्ये इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्यावतीने ‘सक्षम तू अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात चाकणकर बोलत होत्या.चाकणकर म्हणाल्या, गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. फेसबुक व्हाट्सअप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना संदेश पाठविले जातात.मात्र ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही,कधी बघितल नाही. त्या व्यक्तीला प्रतिसाद देऊ नका, त्यांच्याशी मैत्री करू नका आणि बोलूही नका. शिक्षकांनी पाठ्यक्रमातील एखादा धडा शिकवला नसला तरी चालेल; पण मुलींना निर्भय बनण्याचे संस्कार द्यावेत.

इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याआदेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‘सक्षम तू अभियाना’ मधून मुली चांगला धडा घेतील आणि निर्भय बनतील अशी आशा व्यक्त केली. पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी आपले विचार मांडले.मुलीनी घाबरून न जाता ज्या गोष्टी घरात अथवा शिक्षकांनाही सांगू शकत नाहीत, त्यांनी पोलिसांना सांगावे.कोण त्रास देत असल्यास हेल्पलाईन चा वापर करावा असे सांगितले.कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांचेही भाषण झाले.यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, वाशीम नायकवडे, अमित गाताडे, परवेझ गैबान, सलीम शिरगावे, शिवाजी शिंदे, दशरथ माने,यासीन मुजावर, नासीर अपराध, लतीफ गैबान, आदी उपस्थित होते.



