वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार या विचाराने भारावलेल्या तरुणांना कायद्याचे ज्ञान व्हावे आणि एक आदर्श वकील निर्माण व्हावा या भावनेतून दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे.अशी माहिती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी इचलकरंजीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानतपस्वी, ध्येयवादी समाजशिक्षक आणि द्रष्टे समाजचिंतक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सन १९५४ साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचसुत्रीचा अवलंब करुन महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आज या संस्थेचा वटवृक्ष बहरत असून ४१० हून अधिक संस्कार केद्रांमध्ये १० हजार गुरुदेव कार्यकर्ते ज्ञानदानाचे आणि अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी अध्ययनाचे पवित्र कार्य करीत आहेत. या संस्थेच्या दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स्, कॉमर्स कॉलेज, श्रीमती आ. रा. पाटील कन्या कॉलेज, नाईट हायस्कुल, प्राथमिक शाळा, गर्ल्स हायस्कूल ही संस्कारकेंद्रे इचलकरंजी येथे सन १९६२ पासून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. या संस्कारकेंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले,शैक्षणिक परंपरा कायम ठेवत सन २०२५ पासून दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचा शुभारंभ होत आहे. यामुळे इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांना विधी शिक्षण घेता येणार असून त्यामुळे त्यांना कायदा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. संस्थेचे धाराशिव जिल्ह्यामध्ये विधी महाविद्यालय आहे त्यानंतर इचलकरंजी महाविद्यालय होत आहे. इतर जरी विधी महाविद्यालय झाली तरी ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे तिकडे विद्यार्थी आपोआप आकृष्ट होतील. कोल्हापूर पुणे मुंबई सांगली या ठिकाणी विद्यार्थी कायद्याच्या शिक्षणासाठी जातात आता त्यांना इचलकरंजीतच हे शिक्षण घेता येणार आहे.

संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे म्हणाले, स्पर्धा असेल तर दर्जा आपोआप सुधारतो. आम्ही चांगले शिक्षण आणि सोयी सुविधा देणार आहोत. या ठिकाणी मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. विधी महाविद्यालयाचे उदघाटन बुधवारी ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता. जुना कोल्हापूर नाका, येथे माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे,माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे विधी महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी संस्थेचे अध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,या विधी महाविद्यालयामध्ये पाच वर्षाचा बी.ए.एल.एल.बी. इंटिग्रेटेड डिग्री कोर्स आणि तीन वर्षाचा एल.एल.बी. डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना सुरुवात होणार असून ते शिवाजी विद्यापीठाशी संलग्न् असणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना बार कौन्सिल आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता असून राज्य व केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृती योजना लागू असणार आहेत.दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्या सी.एस. बागडी यांनी या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.पत्रकार परिषदेस सुनिल पाटील,प्राचार्य एस के खाडे, तंत्र शिक्षण विभागाचे दिन डॉक्टर विरेन बरडी,प्रा.विनायक भोई,प्रा.रोहित शिंगे,प्रा डी ए यादव आदी उपस्थित होते.
