वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : तरुणांचा फक्त मतासाठी विचार होत असेल तर ही योग्य गोष्ट नाही.ते तरुण भविष्यात क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज या इचलकरंजी शहरातील पहिल्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.त्यावेळी ते बोलत होते.प्राचार्य साळुंखे म्हणाले, पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालये स्थापन करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक कौशल्य या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचार आत्मसात करून सुसंस्कारी वकील, न्यायाधीश निर्माण होतील. उद्घाटन समारंभास संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख मा. श्रीराम साळुंखे, इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, बार कौन्सिल महाराष्ट्र – गोवाचे माजी चेअरमन ॲड. विवेक घाटगे यांची उपस्थिती होती.
मागणीची जाण
देशात एल एल बी च्या परीक्षेसाठी ३ लाख जागा आहेत आणि ८ लाख अर्ज येतात.विद्यार्थ्यांची खरी मागणी ओळखून इचलकरंजीत लॉ कॉलेज उभारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची जाण संस्था चालकांची असल्याचे यावरून दिसून येते.
प्रकाश आवाडे म्हणाले, “माझ्या जडणघडणीत डी. के. ए. एस. सी. कॉलेजचे योगदान मोठे आहे. माझ्यातील नेतृत्व गुणांचा विकास याच महाविद्यालयातील व्यासपीठावरून झाला आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींच्या शिक्षण विचारात दूरदृष्टी असलेली दिसते. मळलेली वाट न निवडता स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे धाडस आणि बळ या महाविद्यालयाने आणि बापूजींनी आम्हाला दिले. बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करून संस्थेने ज्ञान शिदोरीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, इचलकरंजी शहरात दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची स्थापना ही इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक विकासाची नांदी आहे. या कॉलेजच्या माध्यमातून येथील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असून नामवंत वकील व न्यायाधीश निर्माण होतील व ते आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास मला वाटतो.

ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, ॲड. विवेक घाटगे, श्रीराम साळुंखे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हितेंद्र साळुंखे, ॲड. हितेश राणिंगा, प्राचार्या ॲड. बागडी मॅडम, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य विरेन भिर्डी, अमित आव्हाड, मयूर बोरगे, ॲड. तौफिक नाईकवडे, अजित भोसले, अजहर दाडीवाले, प्रा. चेतन पाटील, डी. आर. पाटील, श्री. रमेश रावण, प्रा. रिटा रॉड्रीक्स आदींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सीईओ मा. कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या.आभार संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अतिष पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील, ॲड. इंद्रजीत चव्हाण, ॲड. अमित सिंग, मा. गणबावले, ॲड. शाहू काटकर उपस्थित होते.
