इचलकरंजी फेस्टिवल चे थाटात उद्घाटन

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : विविध रंगाचे, स्वादाचे, आकाराचे केक आणि विविध प्रकारच्या राईसचा सुटलेला घमघमाटासह बलदंड शरीरयष्टीच्या माध्यमातून इचलकरंजी फेस्टिव्हल श्री चा मान मिळिवण्यासाठी लागलेली चढाओढ अशा उत्साही वातावरणात इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ चा शुभारंभ करण्यात आला.

माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व अप्पर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची महाआरती व दीपप्रज्वलन करून फेस्टिव्हलची शानदार सुरुवात झाली.स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी २९ वर्षापासून माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल आणि गणेशोत्सव है अनोखे नातेच निर्माण झाले आहे. ही धुरा आमदार राहुल आवाडे व संयोजिका मोश्मी आवाडे सांभाळत आहेत. यंदाही ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत ना. वा. घोरपडे नाट्यगृह येथे इचलकरंजी फेस्टिव्हल भरविण्यात येत आहे.

प्रारंभी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व अप्पर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस, प्रकाश दत्तवाडे, श्रीरंग खवरे, पत्रकार अतुल आंबी, अरुण काशीद, हुसेन कलावंत, अजिंक्य रेडेकर, राजेश वडाम, दिपक माने आदीच्या हस्ते महाआरती व दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी तर स्वागत सेक्रेटरी शेखर शहा यांनी केले. त्यानंतर विविध पाच गटातील शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ झाला.यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी फेस्टिव्हलचा आढावा घेत सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक सलोखा व बंधुता जपत आपले शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत तरुणाईने यासाठी पुढाकार घ्यावा. पोलिस प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया, असे आवाहन केले.सकाळच्या सत्रात महिलांसाठी अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये केक डेकोरेशन आणि राईस (भात) प्रकार यांचा समावेश होता. स्पर्धेचा शुभारंभ महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या स्पर्धांना महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सहभागी महिलांनी विविध प्रकारचे आकाराचे, चवीचे असे केक तर तब्बल ४७प्रकारचे राईस बनविले होते. त्यामध्ये केक प्रकारात प्रशांती बडवे मावा कुल्फी केक (प्रथम), प्रेरणा दावरा – पिस्तामुनाफा चॉकलेट चीज केक (द्वितीय), भक्ती ववनानी गहु रबडी केक (तृतीय) यांनी यश प्राप्त केले. त्याचबरोबर राईस (भात) प्रकारात करिष्मा राघवानी तंदूरीमशरुम राईस (प्रथम), सविता जगताप – व्हेजिटेबल बिर्याणी (द्वितीय) आणि कार्तिकी चिले पुरीयोगटे राईस (तृतीय) यांनी यश मिळिवले. त्याचबरोबर सना मुल्ला (कर्स्टर्ड राईस) व राजश्री टकले (तांदळाची खीर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून समृध्दी चौगुले व किरण शिंद यांनी काम पाहिले. याप्रसंगी सपना भिसे, नजमा शेख, सीमा कमते, अर्चना कुडचे, शितल सुर्यवंशी, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, जयश्री शेलार, तेजस्विनी जगताप, सुवर्णा लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *