वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : इचलकरंजीतील भव्य असे राजाराम मैदान आवश्यक त्या सर्व सुविधांसह अत्यंत चांगल्या दर्जाचे करण्यासह त्याचा लाभ शहरी व ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मिळावा यासाठी महानगरपालिकेचे राजाराम स्टेडीयम विकसित करण्यासाठी आमदार राहुल आवाडे प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे सेक्रेटरी कमलेश्वर पिसाळ यांच्यासोबत शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन मैदानाची पाहणी करण्यात आली. प्रदीर्घकाळापासून विकासासाठी प्रलंबित राजाराम स्टेडीयमचे रुपडे या माध्यमातून पालटणार असलेने क्रिकेटेप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुमारे 8 एकरपेक्षा अधिक जागेत सन 1986 साली राजाराम स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तर सन 1995 मध्ये स्टेडियमचा विस्तार करण्यात आला. महानगरपालिका मालकीच्या या मैदानावर मागील 18 वर्षांमध्ये आजतागायत एकमात्र रणजी सामना वगळता कोणताही मोठा सामना झालेला नाही. मोठे सामने भरविण्याच्या दृष्टीने याठिकाणी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील क्रिकेट खेळाडूंना दैनंदिन सराव आणि स्पर्धा भरविण्याच्या दृष्टीने अत्यंच अडचणी येत होत्या. क्रिकेट संघटनांकडून या मैदानाचा विकास करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती.त्याच अनुषंगाने शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगले मैदान तसेच त्याचठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा व्हाव्यात यासाठी आमदार राहुल आवाडे हे प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर शासनानेही क्रीडा क्षेत्रासाठी प्राधान्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या माध्यमातून क्रीडांगणांचा विकास व सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. इचलकरंजीतील राजाराम स्टेडीयमसुध्दा चांगल्या दर्जाचे होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या माध्यमातून विकसित करण्याचा विचार आहे.

त्यातूनच एमसीए चे सेक्रेटरी कमलेश्वर पिसाळ यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपस्थित होते. आमदार आवाडे यांनी मैदानासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेतही बैठक झाली. त्यामध्ये शासनाच्या नियम व अटीनुसार महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन सोबत करार करुन राजाराम मैदानाचा विकास व आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासह देखभाल दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भातील रुपरेखा लवकरच निश्चित होऊन राजाराम मैदानाला भव्यता प्राप्त होणार आहे. यावेळी महानगरपालिका क्रीडाधिकारी सुर्यकांत शेटे, शेखर शहा, सचिन खोंद्रे, नागेश पाटील, धनंजय टारे आदींसह विविध असोशिएशनचे पदाधिकारी, क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.
