वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : जिल्हयातील ज्येष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवारी रेल्वेने मुंबईला जाणार होते.त्यावेळी मिरज रेल्वे स्थानकावर एका मुलाची झालेली भेट आणि आलेला भावस्पर्शी अनुभव त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
सोमवारी दि. २३ रोजी मिरज येथील कार्यक्रम आटोपून मुंबईला जाणारी श्री. महालक्ष्मी एक्सप्रेस पकडण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमाराला जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर आलो. रेल्वेची वाट बघत असतानाच तिथे भेट झाली चिपरी ता. शिरोळ येथील श्री. उत्तम घोलप व कु.आर्यन घोलप या पिता-पुत्रांची. त्यांनी मनोभावे नमस्कार केला. ते मला सांगू लागले की, दहा वर्षांपूर्वी हा आर्यन कॅन्सरने जर्जर झाला होता. तुमच्या प्रयत्नातून मुंबईतील हिंदूजा या नामांकित हॉस्पिटलमध्ये महागडे उपचार मोफत करून तुम्ही त्याला जीवनदान मिळवून दिले होते. आज तुमच्या आशीर्वादानेच हा माझा मुलगा आरोग्यमय जीवन जगत आहे.आगंतुकपणे भेटलेल्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने सांगितलेल्या पिता-पुत्रांच्या त्या आठवणीने मीही गहिवरलो. एवढ्यातच या दोघा पिता पुत्रांनी आर्यन याची आई सौ.अर्पिता यांना व्हिडिओ कॉल केला आणि माझे बोलणेही करून दिले. व्हिडिओ कॉलवर बोलताना त्यांनाही कृतज्ञतेने हुंदका आवरत नव्हता, त्यांना नीट आभारही मानता येत नव्हते. भावनिक झालेल्या सौ. अर्पिता म्हणाल्या, “साहेब, तुमच्यामुळेच माझ्या एकुलत्या एक आर्यनचे श्वास सुरू आहेत. वारीच्या काळात मला तुमच्या रूपाने साक्षात विठ्ठलाचेच दर्शन झाले. मी धन्य झाले…..!”यावेळी कधीही कसलीही अडचण लागली तरी मला भेटा, मी अहोरात्र तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी जनतेचा सेवक आहे. असा या कुटूंबाला धिर दिला.
