वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांनी हास्यधमाका कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजी वासियाना खळखळून हसवले सुमारे साडे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात लावणी,गाणी आदींचे सादरीकरण झाले. महापालिका वर्धापन दिनानिमित्त ‘हास्य धमाका’ या कार्यक्रमाचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्यातील हास्यधमाका हा शेवटचा कार्यक्रम झाला.
दिग्गज कलाकारांनी खळखळून हसवले

हास्यजत्रा या टीव्ही मालिकेतील कलाकार अरुण कदम व श्यामसुंदर रजपूत यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादावर हसवले तर पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांनी ड्रायव्हिंग स्कूल च्या माध्यमातून प्रेक्षकांना खेळवून ठेवले. या कलाकारांनी टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळवली. याचबरोबर आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना राजेश हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव, संदीप डवरे, जयवंत भालेकर या बहुसंख्य कलाकारांच्या सहभागातून लावणी,गाणी याचे सादरीकरण हास्य धमाका मध्ये करण्यात आले.

आमदार राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन

या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे आमदार डॉ.राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि सहभागी कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आयुक्त यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी महानगर पालिका कामकाजाचा थोडक्यात आढावा घेऊन भविष्यकालीन महत्त्वपूर्ण योजनांचा आराखडा सादर करून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ राहुल आवाडे यांना केले.
लावणी आणि गाण्यांनी रसिकांना खेळवून ठेवले



कार्यक्रमात सपना हेमन आणि अक्षता सावंत यांनी हिंदी मराठी गीते सादर करून तर आकांक्षा कदम, माया शिंदे आणि धनश्री दळवी यांनी हिंदी गीतांवर बहारदार नृत्य विष्कार आणि मराठी लावण्या सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या कॉमेडी किंग अरुन कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नेटके नियोजन

सुमारे 3000 हून अधिक प्रेक्षकांनी नाट्यगृह आणि परिसरामध्ये उपस्थित राहून कार्यक्रम पाहिला. कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगर पालिकेकडून नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये तसेच लॉन मध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रम पाहण्याची सोय केली होती.अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. नेटके नियोजनामुळे सर्वांना कार्यक्रम पाहता आले.तसेच यूट्यूब चैनल च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले त्यामुळे हजारो लोकांनी घरबसल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

