वस्त्रनगरी वृत्तसेवा
मुंबई पोलीस दलातील एक यशस्वी अधिकारी, सलमान खान ला हिट अँड रन केस मध्ये पाच वर्षाची शिक्षा लावणारे व सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध लढणारे अधिकारी, समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे अधिकारी म्हणून राजेंद्र श्रीमंधर काणे हे नाव इचलकरंजी व परिसराला सर्वश्रुत आहे.आपल्या कर्तुत्वाने कितीही मोठे झाले तरीही गावाशी नाळ जोडून ठेवणारे हे अधिकारी 30 जून 20 25 रोजी मुंबई पोलीस दलातून अपर पोलीस अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जीवन कार्याचा आणि कार्यकर्तृत्वाचा घेतलेला थोडक्यात आढावा…

राजेंद्र काणे व माझी मैत्री सन 1985 पासून ची आहे. काणे कुटुंबाशी जोडलेले नाते आजही कायम आहे.सन 1990 मध्ये एकतर्फी वाटणारी टी वाय बी कॉम या वर्गातली सी आर पदाची निवडणूक काणे साहेब हरले.मित्रांनीच निवडणुकीत पराभव केला. त्या मित्रांना “साहेब” म्हणायला लावल्याशिवाय इचलकरंजीत परत यायचे नाही. असे ठरवून राजेंद्र आणि भाऊ संतोष इचलकरंजीतून बाहेर पडले.सन 1993 मध्ये दोन्ही भाऊ पीएसआय म्हणून उत्तीर्ण होऊनच इचलकरंजीत आले.पोलीस खात्यातील ट्रेनिंग नंतर राजेंद्र ची नागपूर परिक्षेत्र मध्ये बदली झाली. राजेंद्र काणे सारखा अधिकारी हा मुंबई पोलीस दलात असावा असे आम्हाला वाटल्याने आम्ही प्रयत्न करून त्यांची बदली मुंबई शहर येथे करून घेतली. मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक असताना आम्ही त्यांना भेटायला गेलो. मूळचे कोल्हापूरचे असलेले पोलिस निरीक्षक (गुंन्हे) श्री अशोक कदम साहेबांनी सांगितले की “राजेंद्रचे भवितव्य खूप उज्वल आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणूनच आम्ही त्यांना प्रोबेशनरी अधिकारी असताना सुद्धा पोलीस ठाण्यातील महत्त्वाची गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविली आहे”. हे ऐकून मित्र म्हणून आम्हाला खूप खूप आनंद झाला.

अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारा वर्षापूर्वी ननंद भावजचा झालेला खुनाचा गुन्हा, चहा वाला व गवळी यांच्या बोलण्यातून उघडकिस आणला. एका रात्री त्यांच्या पथकाची दाऊद इब्राहिमच्या गुंडाशी चकमक झाली आणि त्या चकमकीत काणे साहेब व त्यांच्या टीम कडून तो गुंड एन्काऊंटर मध्ये मारला गेला.त्यानंतर काणे साहेब अत्यंत धाडसी, हुशार व कर्तृत्ववान अधिकारी असल्याचे समोर येऊ लागले. वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी महोदय यांच्यासोबत इचलकरंजीतील यंत्रमाग सहकारी सोसायटीच्यासंदर्भत आमची व शिष्टमंडळाची मंत्रालय मुंबई मध्ये भेट घडवून आणली. इचलकरंजीतील तरुण, होतकरू उद्योजकांना बऱ्याच वेळी राहण्याची जेवणाची व्यवस्था काणे साहेबांनी केली.गावच्या तरुणांसाठी काहीतरी करण्यात इच्छा असणाऱ्या काणे साहेबांचा हा दुसरा गुण आम्हाला दिसला.

नागपाड्यासारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर एकाच महिन्यात 28 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक विक्रम केला. एक आंधळ्या साक्षीदाराकडून आरोपीचा आवाजावरून ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. समाज व्यवस्थेची जाण असलेल्या काणे साहेबांनी कामाठीपुरा येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या कन्नड भाषीक महिलांना आपल्या कन्नड भाषेचा उपयोग करून त्यांना त्या व्यवसायापासून परावृत्त केले.त्यातील २५ महिला व्यवसाय सोडून आपल्या गावी परत गेल्या.याचा आम्हाला मित्र म्हणून अभिमान वाटतो.त्यानंतर ते विलेपार्ले पोलीस ठाणे येथे हजर झाले. विलेपार्ले तसा उच्च मध्यमवर्गीय लोकांची वस्ती असलेला परिसर त्या ठिकाणातील चोरीचे प्रमाण वेगवेगळे उपाय करून कमी केले. आणि लोकांचा विश्वास जिंकला त्यामुळे ते लाडके अधिकारी झाले.

सहा. पोलीस निरीक्षक म्हणून काणे साहेबांची पदोन्नती अंबोली पोलीस ठाणे येथे झाली.गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी वेगळी कल्पना लढवण्याची सूचना अप्पर पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी काणे साहेबांना केली.काणे साहेबांनी चोरी,घरफोडी,मोटरसायकल चोऱ्या कशा होतात या विषयी स्क्रिप्ट लिहून त्याच्या मार्गदर्शनाखाली सहा शॉर्ट फिल्म काढल्या.त्यात कलाकार म्हणून काणे साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांची मुले व त्यांचे मित्रमंडळी इचलकरंजीचे धनराज खंडेलवाल व दिलीप मुथा यांनी सुद्धा काम केले होते.सर्व माध्यमातून त्याचा प्रसार करून व्यापक जनजागृती करण्यात आली.त्यांच्या कार्याची दखल घेऊन इंडियन मर्चंट चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई यांनी काणे साहेबांचा प्रशस्तीपत्र पत्र, रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

त्या नंतर त्यांची पोलिस निरीक्षक म्हणून वांद्रे पोलिस ठाण्यात बदली झाली.येथील त्यांची कार्यकिर्द यशाच्या शिखरावर कळस लावणारी ठरली. काणे साहेबांनी त्या ठिकाणी सहा कोटी रुपये चा 16 किलो सोन्या चांदीचे दागिन्याचा दरोड्याचा गुन्हा उघडकीला आणला त्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबलसह दहा आरोपींना अटक होऊन सर्वांना १० वर्षाची शिक्षाही झाली.

संपूर्ण भारतभर चर्चिले गेलेला सलमान खान हिट अँड रन खटला चालविण्याची जबाबदारी या इचलकरंजीचे सुपुत्र राजेंद्र काणे यांच्यावर आली. काणे साहेबांनी ज्या धाडसाने, संयमाने, चिकाटीने बारा वर्षानंतर उत्तर प्रदेश कर्नाटक येथून साक्षीदारांना शोधून आणून तो खटला लढविला. त्यावेळी अनेक वेळा कोर्टात सलमान खान बसलेला असताना आपल्या इचलकरंजीच्या काणे साहेबांच्या मित्रांना जाऊन काणे साहेब कसा धाडसाने खटला चालवत आहेत हे पाहण्याचा योग आला. सलमान खान सारख्या सुप्रसिद्ध कलाकाराविरुद्ध खटला चालवत असताना खटल्याच्या बातम्या दाखविल्या जात असत, त्यावेळी साहेबांना टीव्हीच्या बातम्यांमध्ये पाहून आम्हा मित्रांना खूप आनंद होत असे. काणे साहेब नेहमी शांतचित्ताने, एकाग्रतेने त्यांचे काम करत असताना आम्ही पाहिले आहे. तेंव्हा काणे साहेब म्हणायचे, “हा खटला मी हरलो तर मुंबई पोलीस हरेल” त्यामुळे हा खटला मी कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच! आणि तो त्यांनी जिंकला. सलमान खान यास पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आणि काणे साहेबांचे नाव देशपातळीवर चर्चिले गेले. तेव्हा त्यांचे मित्र म्हणून आम्हाला आपल्या इचलकरंजीच्या नागरिकांना आपल्या सुपुत्राचा खूप खूप अभिमान वाटला.

त्यानंतर त्यांची खार पोलीस ठाणे येथे बदली झाली त्या ठिकाणी वाहतूक पोलीस हवलदाराच्या खुनाच्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा साहेबांच्या तपासामुळे झाली. तसेच काणे साहेबांनी त्या वाहतूक पोलीस हवालदार श्री विलास शिंदे यांना शहीद दर्जा मिळवून देण्यासाठी व त्यांच्या मुलास पोलीस खात्यामध्ये सरळ पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करावी म्हणून सुद्धा चौकटीच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खार पोलीस ठाण्याच्या त्याच वेळी बहुचर्चित मीडियामध्ये गाजलेला शिना बोरा खून या गुन्ह्यामध्ये सुद्धा सहाय्यक तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले. खार पोलीस ठाणे येथून पुन्हा विलेपार्ले पोलीस ठाणे येथे बदली झाली आणि विलेपार्लेतील नागरिकांनी त्यांचे लाडके अधिकारी परत आल्याने आनंद व्यक्त केला.

सन 2019 मध्ये करोनाची लाट आली मुंबईसारख्या शहरात हातामध्ये माईक घेऊन अनाउन्समेंट करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली.पार्लेकर पोलीस मित्रांच्या मदतीने त्यातील तीन ते चार वेड्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले, वृद्धांना आधार दिला. “घरात रहा” हे गाणे लिहिले आणि स्वतः गायले. ते गाणे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी स्वतःहून ते गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ते गाणे गायले. मुंबई पोलिसांसाठी सहा मजली सहा इमारतीमध्ये हॉस्पिटल उभे करण्यासाठी काणे साहेबांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली. सहाशे बेडचे पोलीस हॉस्पिटल सुरू झाले. हरहुन्नरी अधिकाऱ्याचे पुन्हा प्रमोशन होऊन त्यांची नेमणूक सांताक्रुज पोलीस ठाणे या मुंबईतील मोठ्या पोलीस ठाण्यास झाली.

जूहु चौपाटीवरील गणपती विसर्जन, देवी विसर्जन, छटपूजा लाखो लोकांनी भरलेला या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था व अतिरेकी हल्ला या सर्वांपासून सावधानता बाळगून बंदोबस्त चोक जबाबदारी पार पाडली.एका हवलदारांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. काणे साहेबांनी सर्व अधिकारी अंमलदारांना प्रेरित करून सर्वांनी मिळून एकत्र सात लाख रुपयांची मदत त्या कुटुंबाला केली हा सुद्धा काणे साहेबांच्या मानाचा फार मोठेपणा पोलीस दलात दिसून आला आहे. काणे साहेबांचा पोलीस बाप्पा तर प्रसिद्ध आहे. त्या मार्फत सुद्धा त्यांनी अनेक गाणी लिहून मोठ्या हिंदी मराठी कलाकार क्रिकेट खेळाडू यांना घेऊन वाहतूक नियमांचे पालन ड्रग्स सायबर गुन्ह्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे

महापुरात सन २०१९ साली इचलकरंजी, नृसिंहवाडी आणि चिपळूण मध्ये जाऊन मोठी मदत विध्यार्थी आणि शाळांना केली.काणे साहेबाना आतापर्यंत 295 बक्षीस मिळविले आहेत. मुंबई पोलीस दलात हाताच्या बोटावर मोजण्यासारखे अधिकारी असतील की ज्यांना 14 मुंबई पोलीस आयुक्तांकडून 17 वेळा प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्यांना 2015 मध्ये महाराष्ट्र पोलीस पदकाने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. काणे साहेबांच्या या अशा हरवून्नरी व्यक्तिमत्त्वाला राष्ट्रपती पदक मिळावी हे आम्हा मित्रांची खूप इच्छा होती.

आणि काणे साहेबांचे काम सुद्धा त्याच्या तोला मोलाचे होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे काणे साहेबांना त्या पदकाने हुलकावणी दिली असली तरी सुद्धा त्यांनी मुंबई पोलीस दलामध्ये जे काम केले आहे ते काम, ज्या समाजासाठी काम केले आहे त्या समाजाचे आशीर्वाद, पाठबळ काणे साहेबांच्या आयुष्यात नेहमी सोबत राहील. काणे साहेब त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुंबई, इचलकरंजी शहरांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारे काम करून समाजामध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील. दुसरी इनिंग जोरदारपणे लढवतील अशीच आम्हा सर्व मित्रांना अपेक्षा आहे.
अशोक स्वामी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई


