वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रॉव्हिडंट फंडाचे 1 कोटी 60 लाख रुपये जमा करण्यात आले.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.या संदर्भात भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी निवेदन दिले होते.

प्रॉव्हिडंट फंड हे निवृत्ती पश्चात कर्मचा-याचे उदरनिर्वाहाचे साधन असते. कर्मचा-यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढत आहे. तसेच त्या पैशामधूनच कर्मचारी आपले औषध उपचार करत असतो. त्यांना वेळेत लाभ न मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती ढासळू शकते.अशा आशयाचे निवेदन उमाकांत दाभोळे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यांची त्वरित दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली. लेखापरीक्षण,लेखापाल तसेच आस्थापना विभाग यांना आदेश देऊन सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती पश्चात लाभ प्रकरण तातडीने निर्गत करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुसार आज बुधवारी पहिल्या टप्प्यात 23 सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 60 लाख 27 हजार 13 रुपये जमा केले. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.उमाकांत दाभोळे म्हणले, उर्वरित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
