अशोकराव स्वामी (आण्णा) यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी (आण्णा) यांचा १ एप्रिल रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. समाजाभिमुख विचार जपत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि गरजू घटकांना मदत या उद्देशाने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजहिताचे उपक्रम राबवून एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता अरुण विद्यामंदिर संग्राम बालवाडी येथे होणार असून विद्यार्थ्यांना खाऊवाटप व भोजन देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता डॉ. कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचवेळी नारायणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार असून नागरिकांना डोळ्यांची तपासणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सकाळी ९.३० वाजता लायन्स ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समाजातील गरजू रुग्णांना रक्ताची मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता स्टेशन रोड येथील मँचेस्टर वाळू डेपो परिसरात जय भीम नगर ग्रुप यांच्या वतीने सरबत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता हुपरी येथील व्यंकटेश सूतगिरणी येथे कामगारांना अल्पोपहार देण्यात येणार आहे.

तसेच सकाळी ११.३० वाजता कोरोची येथील वात्सल्य वृद्धाश्रमासाठी किचन बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असून हा उपक्रम माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सर्व कार्यक्रमांचे नियोजन अशोकराव स्वामी विचारमंच यांच्या वतीने करण्यात आले असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सेवा या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा जपली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *