वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : २१ वर्षांनी आलेल्या श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. लाखो भक्तांनी विघ्नहर्त्याचे दर्शन घेत पूजाअर्चा, आरती आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठणात सहभाग नोंदवला.

मंदिर परिसर फुलांच्या सजावटी व लाईट माळांच्या आरासाने सजवण्यात आला होता. भाविकांची सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसराची स्वच्छता तर वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहतूक याची काळजी घेतली.
सकाळी ११ वाजल्यापासून मंदिर भक्त मंडळातर्फे साबुदाणा-भगर प्रसादाचे वाटप करण्यात आले. पहाटेपासून रात्रीपर्यंत भाविकांनी शिस्तबद्ध रांगेतून बाप्पाचे दर्शन घेतले.

काकड आरती भक्त मंडळाकडून, सकाळची आरती श्री व सौ. युवराज माळी यांच्या हस्ते, सायंकाळची आरती जिल्हा न्यायाधीश गांधी, भोसले व अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे-शिंदे यांच्या हस्ते तर चंद्रोदयाची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तांच्या जयघोषात पार पडली.
मंदिर भक्त मंडळ अध्यक्ष अशोक स्वामी, बाळासाहेब जांभळे, हनुमंत वाळवेकर, विष्णुपंत शिंदे, विनायक रेडेकर, प्रशांत चाळके, सुनील ताडे, गजानन स्वामी, मोहन नाझरे, सचिन देशमाने, सुनील भैया तोडकर, सुधीर जाधव, बाळकृष्ण मिटारी, गजानन पाटील, विवेक मस्के आदींनी दिवसभर कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
