वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महानगरपालिका मधील सेवा निवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील पाचवा व शेवटचा हप्ता मंगळवारी त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला.त्यामुळे ५ कोटी ७३ लाख रुपये सुमारे २८०० कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी रक्कम कर्मचाऱ्यांच्या हातात पडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा : भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रकमेच्या वाटपासाठी जे सर्वांनी परिश्रम घेतले, त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार हा हप्ता वितरित करण्यात आला आहे.
सातवा वेतन आयोग केंद्र सरकारने २०१६ पासून लागू केला होता. ज्यामध्ये एक जानेवारी २०१६ पासून वेतन सुधारणांची शिफारस करण्यात आली होती.त्यामधील थकबाकीचे पाच हप्ते देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील हा पाचवा व अंतिम हप्ता आहे.या निधीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे २ कोटी ६ लाख रुपये तर सध्याच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना ३ कोटी ६७ लाख १७७५ रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार, आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना यांचे सहकार्य लाभले.
