वस्त्रनगरी वृत्तसेवा
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या नांदणी (ता. शिराेळ) येथील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रिट पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत केली. त्याचबराेबर या प्रकरणात पाेलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे या आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाहीही दिली. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीण परत नांदणी मठात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गुन्हे मागे घेणार : महादेवीला वनतारामध्ये पाठवत असताना नांदणी येथे घडलेल्या एका घटनेत दगडेक व मारहाण प्रकरणी पाेलिसांनी काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे हे गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही दिली.
मागील 35 वर्षे नांदणी येथील मठात असणाऱ्या महादेवी हत्तीणीला पेटा या संस्थेने महादेवी हत्तीणीची देखभाल नीटपणे हाेत नसल्याबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या माध्यमातून जामनगर (गुजरात) येथील वनतारा याठिकाणी पाठविण्यात आले आहे. या निर्णयाच्या विराेधात सर्वच स्तरातून तीव्र भावना व्यक्त हाेत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदाेलने छेडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयाेजित केली हाेती
बैठकीस दिग्गजांची उपस्थिती : बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आराेग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमल महाडीक, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशाेक माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ललित गांधी, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमाेल येडगे, जिल्हा पाेलिस अधिक्षक याेगेशकुमार गुप्ता, सदाभाऊ खाेत, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासाे भगाटे, सागर पाटील, अॅड. मनाेज पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर व संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी, नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ही काेल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सर्वधर्मीयांच्या भावना तिच्याशी जाेडलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठाकडे सुपूर्त करावे. सर्व जातीधर्माच्या लाेकांच्या लाेकभावनेचा जराही विचार न करता वनतारा येथे स्थलांतरीत करण्यात आले. स्थानिक जनभावना व धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन, पुन्हा तिला परत आणण्याची शक्यता अजूनही अस्तित्वात असलेने शासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनाेगतात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्तीणीला न्यायालयाच्या निर्णयानुसार वनतारामध्ये नेण्यात आले. त्यामध्ये शासनाची भूमिका नाही. हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. परंतु हत्तीणीमध्ये गुंतलेल्या जनभावनांचा लक्षात घेऊन जे काही कायदेशीर पर्याय आहेत त्यानुसार राज्य शासन महादेवी उफर् माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल. नांदणी मठाने सर्वाेच्च न्यायलयात याचीका दाखल करावी.

तसेच सरकार म्हणून देखील आम्हीही सर्वाेच्च न्यायलयात याचीका दाखल करणार आहे. महादेवी परत यावी अशी आमची भूमिका आहे. तिची काळजी घेण्यासाठी डाॅक्टरांच पथक तयार करण्यात येईल राज्य सरकार नांदणी मठासाेबत पूर्ण ताकदीनिशी साेबत राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

