वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : तलाठ्यांना विविध प्रकारचे दाखले द्यावे लागतात. त्यांना गतीने काम करता यावे यासाठी आता नवीन अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटर एका महिन्यात देण्यात येईल अशी माहिती राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात
महसूल विभागामध्ये अप्पर मुख्य सचिवाचा पदभार नुकताच विकास खारगे यांनी स्वीकारला.राज्यातील विविध जिल्ह्यांना आठवड्यातून एक दिवस भेटी देऊन आढावा घेण्याबरोबरच समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यापासून त्यांनी केली. शनिवारी त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात हातकलंगडे व शिरोळ विभागातील आयुक्त,मुख्याधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यांचे स्वागत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केले.विकास खारगे यांच्या हस्ते प्रांत कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा बैठक घ्यावी.
तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात भेडसावणाऱ्या प्रश्नांची सूची तयार करून महिन्यातून एकदा तरी बैठक घ्यावी चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा. प्रत्येक गाव व शहर स्वच्छ असले पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, शासन स्तरावर अथवा विविध विभागांमध्ये जर प्रस्ताव प्रलंबित असतील, काही समस्या असतील तर ते मला सांगावे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. दोन-तीन महिन्यातून एकदा अडचणी समजावून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्र बसावे.
धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करावा : आपल्या परिसरामध्ये बाहुबली, नृहसिंहवाडी, खिद्रापूर आदी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात लोक भेट देत असतात.त्याचा विकास प्राधान्याने केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल.
वर्ग दोन जमिनीचा प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान या अंतर्गत असलेली पाणंद रस्ते,त्याच्या भोवती झाडे लावणे ही कामे गतीने करावी. नागरिकांना सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देता येतील. नागरिकांना देण्यात येणारी दाखले सुद्धा डिजिटल सिग्नेचरने कसे देता येतील यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. इचलकरंजी शहराशी संबंधित झेड एल डी चा आणि वर्ग दोन जमिनीचा प्रश्न नागरिकांकडून आला होता. त्या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर,अनिलकुमार हेळकर,महेश खिलारी,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, नारायण घोलप, मुख्याधिकारी टीना गवळी, अजय नराळे,संजय काटकर आदी उपस्थित होते.

