वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहरातील मिळकतधारकांसाठी महापालिकेने दंड व व्याजमाफीची अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत एकरकमी रक्कम भरल्यास ९० टक्के दंड व व्याज माफ होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील मिळकतधारकांसाठी मालमत्ता कर विभागाच्यावतीने अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड व व्याज एकरकमी भरल्यास सवलत मिळणार आहे. मात्र, अनधिकृत बांधकामांवरील शास्ती वगळून ही सवलत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एका महिन्याच्या कालावधीत रक्कम भरल्यास खालीलप्रमाणे दंड व व्याज सवलत मिळणार आहे. १ ते १५ ऑक्टोंबर ९० टक्के सवलत, १६ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर ७५ टक्के सवलत, ४ ते १८ नोव्हेंबर ५० टक्के सवलत, तर १९ ते २७ नोव्हेंबर २५ टक्के दंड व व्याजामध्ये सवलत देण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालय तसेच प्रभाग समिती विभाग कार्यालयातील कर संकलन केंद्रामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५ या वेळेत मालमत्ताधारकांना धनादेश व ऑनलाइन भरणा करता येईल. एकवेळ मिळणाऱ्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आयुक्त पाटील यांनी म्हटले आहे.
