वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होऊन सेवा बजावत असलेल्या आणि नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) 20.000/- देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केली होती.
दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी सादर केली. या मागणीस मा. आयुक्त पल्लवी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.
दाभोळे यांनी सांगितले की, “महानगरपालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी हे प्रामाणिकपणे व मनोभावे सेवा बजावत आहेत. दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक होते. आयुक्त पल्लवी पाटील यांनी यासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.”
या निर्णयामुळे अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

